शक्तीपीठ महामार्गाविरोधात आमदार चंद्रकांत (राजू) नवघरे आक्रमक; शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी थेट अधिवेशनात मांडला मुद्दा!
संपादक हरनामसिंग चव्हाण

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आमदार चंद्रकांत (राजू) नवघरे आक्रमक; शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी थेट अधिवेशनात मांडला मुद्दा!
विशेष प्रतिनिधी, वसमतCT NEWS /हिंगोली
मुंबई/वसमत: प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्गामुळे’ हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंधा नागनाथ तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची अत्यंत सुपीक व बागायती जमीन धोक्यात आली आहे. या अन्यायकारक प्रकल्पाविरोधात स्थानिक आमदार चंद्रकांत (उर्फ राजू) रमाकांत नवघरे यांनी तीव्र पाऊल उचलले असून, चालू विधिमंडळ अधिवेशनात या गंभीर मुद्यावर सूचना क्रमांक ९१ अन्वये थेट लक्षवेधी मांडली आहे. हा महामार्ग संबंधित भागातून तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची आग्रही मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ; सामूहिक आत्मदहनाचा इशारा
आमदार चंद्रकांत नवघरे यांनी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSRDC) च्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध शासनासमोर मांडला आहे. महामार्गाच्या सध्याच्या आराखड्यामुळे:
वसमत तालुक्यातील: बोरी सावंत, गुंडा, आडगाव, करंजाळा, हट्टा, पिंपळगाव कुटे.
औंधा तालुक्यातील: उमरा, सिरला, टाकळखोपा, पुरजळ, रांजाळा.
या गावांच्या परिसरातील सुपीक आणि बागायती शेती नष्ट होणार आहे. यामुळे अनेक तरुण शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार असून, अल्पभूधारक शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होऊन देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, त्रस्त स्थानिक शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
पत्रापाठोपाठ थेट अधिवेशनात कोंडी!
केवळ पत्रव्यवहारावर न थांबता आमदार नवघरे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून थेट राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरले आहे. अधिवेशनाच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत ‘वसमत व औंधा तालुक्यातील सुपीक शेती आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग संबंधित भागातून रद्द करण्याबाबत’ विशेष मुद्दा उपस्थित करून त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आहे.
“शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिरावून घेणारा आणि त्यांना देशोधडीला लावणारा विकास आम्हाला मान्य नाही. आधी आमच्या अन्नदात्याचे रक्षण झाले पाहिजे,” अशी खंबीर भूमिका आमदार चंद्रकांत नवघरे यांनी घेतली आहे. लोकप्रतिनिधींनी थेट सभागृहात या लढ्याला वाचा फोडल्यामुळे संपूर्ण मतदारसंघातून त्यांच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे. आता यावर शासन काय सकारात्मक निर्णय घेणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



