हिंगोली – मुंबई रेल्वेच्या वेळेत बदल करून गाडी नियमित करा- खा.हेमंत पाटील
रामु चव्हाण

हिंगोली – मुंबई रेल्वेच्या वेळेत बदल करण्याची खासदार हेमंत पाटील यांची मागणी
गाडीची वेळ आणि नियमित गाडी चालविण्यासोबतच शेगावला थांबा देण्यासंदर्भात रेल्वे विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद
हिंगोलीहून मुंबईसाठी नव्याने सुरु झालेली नांदेड,-हिंगोली- मुंबई रेल्वे ही गाडी नियमीत चालवली जावी. या गाडीस शेगाव येथे थांबा देण्यासोबतच या गाडीच्या सध्याच्या वेळेत बदल करुन तो रात्री ११ वाजून ४५ मिनिटा ऐवजी तो सायंकाळी चार वाजताची वेळ निश्चित करावी यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल प्रबंधक यांची भेट घेऊन लेखी निवेदन देऊन त्यांच्याकडे गाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली.
खासदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल प्रबंधक यांची भेट घेऊन वरील मागणी केली आहे. मागील अनेक वर्षापासून हिंगोलीहून मुंबईला जाण्याकरिता विशेष रेल्वे सुरु व्हावी अशी हिंगोली, वसमत येथील रेल्वे प्रवाशांची मागणी होती. खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीहून मुंबईला जाण्यासाठी तात्काळ रेल्वे सुरु करण्यात यावी यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांना अनेकवेळा लेखी निवेदन देऊन संसदेत देखील वेळोवेळी हा प्रश्न मांडला. रेल्वेचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याने त्यांच्या प्रयत्नास यश आले आहे.हिंगोलीहून मुंबईला जाण्यासाठी नांदेड-हिंगोली- मुंबई अशी ३० जानेवारी २०२३ पासून ही गाडी चालवण्यात येत आहे. परंतु नव्याने सुरु झालेल्या या गाडीची वेळ रात्री उशिराची असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे . त्यामुळे गाडीची वेळ रात्री ११.४५ ऐवजी सायंकाळी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात यावी. ही गाडी सोमवार आणि बुधवार ऐवजी नियमित चालविण्यात यावी विशेष म्हणजे गाडी शेगाव मार्गे मुंबईला जात असताना देखील गाडी शेगाव देवस्थान येथे थांबा देण्यात आलेला नसल्याने शेगावला देवदर्शनासाठी जाणाऱ्या – येणाऱ्या भाविकांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे हिंगोलीहून मुंबईला आणि मुंबईहून हिंगोली-नांदेडला येणाऱ्या गाडीस शेगाव येथे थाबा दिला जावा अशी खासदार हेमंत पाटील यांनी निवेदनाद्वारे नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल प्रबंधक यांच्याकडे मागणी केली आहे.
त्यांच्या या मागणी नंतर गाडीच्या वेळेत बदल करण्या सोबतच शेगाव येते थांबा आणि गाडी नियमित चालविण्या संदर्भात रेल्वे विभागाकडुन त्यास सकारात्मक विचार करुन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे रेल्वे विभागाकडुन कळविण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड-हिंगोली-मुंबई या रेल्वेनी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना कार्यालयीन वेळेत मुंबईला पोहचता येणार आहे.आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना सोयीचे होणार आहे .