कुरुंदा येथील टोकाई माता गडावर सह्याद्री देवराई परिवाराने सुरु केलेल्या वृक्ष लागवड आणि संगोपणाच्या चळवळीस परिसरातील सर्व वृक्षप्रेमी बांधव सहकार्य करीत असतात, करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपासून गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आज रविवार दि.९ जानेवारी २०२२ रोजी परिसरातील सोमठाणा गावातील इलाईट कोचिंग क्लासेस यांच्या वतीने गडावर सहल आयोजित करण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता सातवीपर्यंतच्या ४३ विद्यार्थ्यांचा समावेश होता. आजचा विद्यार्थी उद्याचा युवा असतो. ज्या वर्गाकडे आपण देशाचं भविष्य म्हणून बघतो. त्या नव्याने घडत असलेल्या पिढीला निसर्गाविषयी, झाडांविषयी आपुलकी निर्माण व्हावी, झाडांविषयी प्राथमिक स्वरूपाचे शिक्षण त्यांना मिळावे, सहलीच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा इत्यादी उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आला होती. यादरम्यान निसर्गाच्या सान्निध्यात सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक वृंदांनी वनभोजनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी संपुर्ण गडाची तेथील सर्व प्रकल्पाची माहीती घेत आपला अनुभव शेअर केला. यावेळी सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्ताने कु.प्रतिक्षा आबासाहेब जगताप, कु.अनुष्का प्रभाकर कदम, कु.अनुष्का महादु जाधव, कु.सानवी ओमशिवा मारडे इ. विद्यार्थिनींनी भाषणे केली, इंग्रजी शब्दांच्या पहिल्या वर्णनावरून भेंड्याचा खेळ घेण्यात आला. यावेळी इलाईट कोचिंग क्लासेसचे विठ्ठल कदम सर, विकी मगर सर उपस्थित होते.
सोबतच यावेळी विद्यार्थ्यांनी कडूनिंब आणि चिंच अशी दोन झाडे लावली आणि सह्याद्री देवराई टोकाईगड परिवाराच्या या अभूतपूर्व कार्यात आपलाही हातभार असावा या जाणिवेतून आर्थिक मदत म्हणून कुणी दहा तर कुणी वीस रुपयाचा वृक्षनिधी गोळा करून एकूण ७३० रु. निधी त्यांनी सह्याद्री देवराई परिवाराकडे सुपूर्त केला. कामाची व्याप्ती समजून घेतल्यावर कामासाठी मदत कुठून येते? कश्या स्वरुपात येते? अशी प्रश्न विचारणारी ही चिमुकली मुलंही मदतीसाठी जेंव्हा हात पुढे करतात ना! तेंव्हा त्यांची ती निरागस भावना, त्यांचा तो विश्वास मोठ्यांनाही लाजवणाराच असतो आणि त्यांचा तोच विश्वास जपण्याची जबाबदारी आम्हालाही स्वस्थ बसू देत नाही. परिसरातील गड म्हणून त्याचा विकास व्हावा ही विद्यार्थांची प्रामाणिक भावना आणि त्याच भावनेतून आपुलकीने त्यांनी केलेली मदत आमच्या मनाला आपल्या स्वतःच्या कार्यापेक्षाही लाखमोलाचीच वाटली.
Elite कोचिंग क्लासेस सोमठाणा यांनी टोकाईगडाच्या विकासासाठी, गडाच्या संवर्धनासाठी दिलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे.