ताज्या घडामोडी

हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दिल्लीत स्पर्धापरिक्षा केंद्र उभारणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

रामु चव्हाण

हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दिल्लीत स्पर्धापरिक्षा केंद्र उभारणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश;राज्यातील पाचशे विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

वसमत : रामु चव्हाण

    देशाची राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( यूपीएससी ) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता दिल्लीमध्ये हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समग्र क्लासेस सेंटर व वसतिगृह होणार असून खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचशे विद्यार्थ्यांसाठी लवकरच क्लासेस सेंटर व वसतिगृह सुरु करण्याची घोषणा केली आहे. अशी माहिती हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली.
दिल्ली हि यूपीएससी अभ्यासाचे माहेरघर समजली जाते. त्यामुळे देशभरातील विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी दिल्लीला येतात. महाराष्ट्रातून दिल्लीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या स्पर्धापरिक्षेच्या माध्यमातून दरवर्षी किमान ७० पेक्षा अधिक विद्यार्थी आयएएस, आयपीएस होतात . मात्र राज्यभरातील शेतकरी व सामान्य कुटुंबातील अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना इथला खर्च परवडत नाही. दिल्लीत राहणे, खाणे व शिकवणी वर्गासाठी त्यांना महिन्याला किमान २० हजार रुपयापर्यंत आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. हा खर्च अमाप असल्याने अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेची तयारी अर्ध्यावर सोडून आपल्या स्वप्नांना मुरड घालुन गावी परतावे लागते.
मात्र भविष्यात दिल्लीत येऊन स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या कोणाही विद्यार्थ्यास खर्च परवडत नाही म्हणून आयएएस किंवा आयपीएस होण्याचे स्वप्न अर्धावर सोडुन गावी परतावे लागु नये, याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.२५) दिल्ली येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारचा दिल्लीमध्ये असलेल्या मोकळ्या भूखंडावर स्व. हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्रातून दिल्लीत स्पर्धापरिक्षेच्या तयारी करण्यासाठी येणाऱ्या किमान एका खोलीत दोन याप्रमाणे पाचशे विद्यार्थ्यांसाठी समग्र क्लासेस सेंटर व वसतिगृह सुरु व्हावे अशी मागणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन दिल्लीत लवकरच स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग सेंटर व सुसज्ज असे वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यभरातून यूपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आनंदाचे वातावरण पसरले आहे . खासदार हेमंत पाटील यांनी समाजातील सर्व वर्गाला न्याय मिळावा या उद्देशाने अनेक निर्णय आणि मागण्या केल्या असून क्लासेस सेंटर व वस्तीगृह मागणी सुद्धा विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!