एक वृक्ष मानव जातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कित्येक रुपाने मदत करत असतो. वर्षानुवर्षे ते झाड आॅक्सिजन, फुलं, फळं, खत आणि विशेष म्हणजे लखलखत्या उन्हातही सावली देण्याचे काम अविरतपणे करते. एका वृक्षाची किंमत करायची झाली तर तो आकडा करोडो रुपयांमध्येच येईल म्हणजे झाडाची किंमत करताच येणार नाही. एवढ्या उपयोगी असतात झाडं. त्यामुळेच आपणास आज घडीला वृक्ष लागवडीसाठी हजारो संस्था जिवाचं रान करतांना दिसुन येतात. त्यामध्ये सह्याद्री देवराई फाऊंडेशनचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यातीलच कुरुंदा (ता. वसमत जि.हिंगोली) येथील सह्याद्री देवराई टोकाईगड फाऊंडेशन गेल्या कित्येक वर्षांपासून टोकाईगडावर झाडं जगविण्यासाठी, ती वाढविण्यासाठी अतोनात प्रयत्न करते. कुठल्याही आणि कुणाच्याही एका रुपयाची अपेक्षा न करता सामाजिक बांधिलकी म्हणून ही संस्था निसर्ग संवर्धनासाठी उभी आहे. पण काही समाजकंटकांनी अनेकदा गडावरील झाडं जाळण्याचा, ती तोडण्याचा, गडावर नासधूस करण्याचा प्रकार सुरुच ठेवला आहे.
आजही टोकाईगडाच्या पायथ्याशी असणारी परिसरातील दोन झाडं तोडण्याचे काम विकृत काही विकृत वृत्तीच्या लोकांनी केले असुन ही बाब अतिशय निंदनीय व सोबतच गांभीर्याने घेण्याची आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेत संबंधित लोकांवर गुन्हा नोंदविण्याची गरज निर्माण झाली आहे. तो गुन्हा प्रशासनाच्या वतीने नोंदवला जावा ही आमची आग्रही मागणी असल्याचे सह्याद्री देवराई फाऊंडेशन व वृक्षप्रेमीनी केली आहे.