वसमत / रामु चव्हाण
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेश निवड चाचणी परिक्षेसाठी आँनलाईन अर्ज अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जानेवारी २०२३ ही अर्ज अपलोड करण्याची शेवटची तारीख आहे. जास्तीत जास्त विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी इच्छूक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरावेत असे आवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.वाघमारे यांनी केले आहे.
भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाकडून चालवत असलेल्या व संपुर्ण:त निवासी असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेल्या संपुर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता ६ वी च्या प्रवेशाकरीता निवड चाचणी प्रवेशाचे अर्ज आँनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सदरील परीक्षा ही २९ एप्रिल २०२३ रोजी शनिवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० दरम्यान होणार आहे.
या वर्षी हे प्रवेश अर्ज संपुर्णत: आँनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहेत. यासाठी कोणतेही शुल्क राहणार नाही. पालक कोणत्याही काँम्प्यूटर सेंटरमधून अर्ज भरु शकतात. यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थी व पालकांची सही स्कँन, विद्यार्थ्यांचा फोटो, इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील सर्टिफिकेट आवश्यक आहे. मुख्याध्यापकांचे सर्टिफिकेट हे विद्यालयाच्या वेबसाईट http://www.navodays.gov.in/nvs/nvs-school/hingoli/in/home & www.navodaya.gov.in वर डाऊनलोड लिंकवर उपलब्ध आहे. तसेच याच वेबसाईट वरुन विद्यार्थी दिलेल्या लिंकव्दारे प्रवेश अर्ज करतील. अर्ज अपलोड करण्याची ३१ जानेवारी २०२३ शेवटची तारीख आहे. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळेच्या मुख्याध्यापकांनी इच्छुक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज तात्काळ भरण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.वाघमारे यांनी केले आहे.