बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र- प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन पुढील दोन वर्षात पाच हजार लोकांच्या हाताला रोजगार मिळेल
खासदार हेमंत पाटील यांचा विश्वास; बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन-प्रशिक्षण केंद्राचे जलपूजन शुभारंभ
वसमत / रामु चव्हाण
– कुठलाही लोकप्रतिनिधी हा आपल्या भागाचा विकास करण्यासाठी निधी खेचुन अनत असतो. मात्र मागील पन्नास वर्षापासून पडीत असलेल्या जमिनिवर केवळ इथल्या जनतेला मार्केट यार्ड नावाचे गाजर दाखविण्यात आले. मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद)संशोधन केंद्राच्या माध्यमातून वसमत – हिंगोली शहराचे नाव देशाच्या नकाशावर झळवणार असून अशा महत्वपूर्ण शंभर कोटी रुपयांच्या प्रकल्पास इथल्या लोकप्रतिनिधींकडुन अडवणूक केली जात होती. परंतु न्यायालयाने त्यांची याचीका खारीज करुन बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केद्रासाठी जागा आणि निधी देऊन विकास कामात अडथळा ठरणाऱ्या लोकप्रतिनिधींना चपराक दिली असून, वीस जेशीबीच्या साह्याने जागेचे काम सुरु असून, पुढील दोन वर्षात जिल्ह्यातील पाच हजार लोकांच्या हाताला रोजगार मिळेल असा खासदार हेमंत पाटील यांनी येथे विश्वास व्यक्त केला.
कन्हेरगाव शिवारातील शुक्रवारी (दि.२४) बाळसाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण संस्था येथे प.पू. श्री सुर्यकांत देसाई गुरुजी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत पाटील बोलत होते. याप्रसंगी तालुकाप्रमुख राजू चापके, रामकिशन झिंजुर्डे, राजेश इंगोले, मच्छिंद्र सोळंके, सिताराम मॅनेवार, गुट्टू शेठ मुरक्या, संभाजी सिद्धेवार, प्रभाकर क्षीरसागर, रवी पाटील नादरे, संतोष शेळके, बाबुराव शेवाळकर, रमेशराव साळुंके, रामप्रसाद हरबळे, व्यंकटेश कराळे, सरपंच गोविंद सूर्यवंशी, पोलीस पाटील मन्मथ बेले, अवधूत शिंदे, अलोक जाधव आणि तालुका कृषी अधिकारी श्री कल्याणपाड यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, मागील ५० वर्षापासून पणन विभागाची ही जागा रिकामी होती. पंधरा वर्षापूर्वी या जागेवर मार्केट यार्ड तयार करण्यासाठी संबंधित विभागाने जागाच नाही तर त्यासाठी दहा कोटी रुपयाचा निधी देखील सरकारने दिला असताना देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या पडीक जमिनिवर वाढलेली चार बांभळीची झाडे काढली नाहीत. उलट पंधरा वर्षापासून परिसरातील शेतकरी आणि पाच हजार उच्चशिक्षित तरुणांना रोजगार देतो म्हणून त्यांच्या भावनांशी खेळणे सुरु होते. अखेर ही जागा पणन विभागाने पुन्हा ताब्यात घेऊन ती बाळासाहेब हळद संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण संस्थेला दिल्यानंतर त्यात याचीका दाखल करुन किंवा कामात खोडा निर्माण करण्याचे काम केले जात आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी काही दलालाना देखील पुढे केले जात आहे.
शेवटी सत्य हे सत्यच असते ते कधीच लपत नाही. मा. न्यायालयाने विरोधकांची याचिका खारीज करुन त्यांच्या तोंडावर चपराक मारली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आज प्रथमच कन्हेरगाव शिवारात मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद)संशोधन केंद्र व प्रशिक्षण संस्थेचे काम वेगाने सुरु झाले आहे. प.पु.श्री सुर्यकांत देसाई गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जलपूजन करण्यात आले आहे. दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून त्यानंतर इथल्या शेतकरी आणि उच्चशिक्षित तरुणाईच्या हाताला रोजगार मिळेल असे खासदार हेमंत पाटील म्हणाले.