क्राईम स्टोरी

वसमत येथील इलेक्ट्रिक दुकानदाराला 23 कोटींची जीएसटीची नोटीस 

रामु चव्हाण

 

वसमत / रामु चव्हाण

वसमत शहरातील एका इलेक्ट्रिक दुकानदारास तब्बल 23 कोटी रुपयांच्या जीएसटीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर दुकानदारान  डोळे पांढरे करण्याची वेळ आली.मात्र अधिक चौकशीमध्ये तेलंगणातील काही आरोपींनी त्यांच्या नावे बनावट कंपनी स्थापन करून 105 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. यावरून वसमत शहर पोलिसांनी मियापुर (तेलंगणा) येथील अज्ञात आरोपीविरुद्ध रविवारी तारीख 28 रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील राजेश दुमाने यांचे इलेक्ट्रिक दुकान आहे. या दुकानातील इलेक्ट्रिक साहित्याच्या खरेदी विक्रीवर तसेच दुरुस्तीच्या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांना वस्तू व सेवा कर कार्यालयाकडून तब्बल 23 कोटी रुपयांचा कर भरणा करण्याची नोटीस प्राप्त झाली. सदर नोटीस प्राप्त होताच राजेश यांचे अवसानच गळाले. इलेक्ट्रिक दुकानाचा मोठा व्यवहार नसतानाही नोटीस कशी मिळाली असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यानंतर त्यांनी हिंगोलीच्या वस्तू व सेवा कर कार्यालयात जाऊन खातर जमा केली. त्यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच नोटीस देखील दाखवली. कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी राजेश यांच्या आधार कार्ड व पॅन कार्ड वरून तपासणी केली असता तेलंगणा राज्यातील सायबेराबाद जिल्ह्यात मियापूर येथे त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड वापरून बनावट कंपनी स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या कंपनीमार्फत तारीख 29 जुलै 2023 ते तारीख 1 जानेवारी 2026 या कालावधीत तब्बल 105 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसून आले. या व्यवहारावरूनच 23 कोटी रुपयांची जीएसटीची नोटीस देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र आपला इलेक्ट्रिक दुकान व्यतिरिक्त कुठलाही व्यवसाय नसल्याचे राजेश यांनी सांगितले. त्यावरून अधिक माहिती नंतर राजेश हे काही दिवसापूर्वी पुणे येथे गेल्यानंतर त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड वापरण्यात आल्याचे दिसून आले. यावरूनच तेलंगणातील आरोपींनी कंपनी स्थापन करून 105 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजेश यांनी वसमत शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून वसमत शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, उपनिरीक्षक रमेश सोनटक्के यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पुढील हालचाली सुरू केल्या.
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये
सदर प्रकार तेलंगणा राज्यातील
सायबेराबाद जिल्ह्यात मियाँपुर येथे घडल्याने वसमत पोलिसांनी सदर गुन्हा मियाँपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!