विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांबाबतचे निवेदन राज्यपालांना सादर केले. यावेळी माजी मंत्री मा. छगन भुजबळ, मा. हसन मुश्रीफ, कु. अदिती तटकरे, आ. अनिल पाटील, आ. नितीन पवार, आ.चंद्रकांत उर्फ राजु नवघरे, आ. सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
या निवेदनात शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेले संकट लक्षात घेऊन विदर्भ, मराठवाडा व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करावा
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी रु. 75 हजार मदत द्यावी, तसेच फळ पिकांसाठी हेक्टरी रु.1 लाख 50 हजार तात्काळ मदत करावी.
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरता सरसकट शैक्षणिक शुल्क माफ करावे.
विदर्भ व मराठवाड्यामध्ये शेतमजुरांची संख्या मोठी असून मागील 15 ते 20 दिवसांपासून शेतमजुरांवर मजुरीअभावी उपासमारीची वेळ आली आहे. शेतमजुरांना सुद्धा एकरकमी मदत करण्याबाबतची सकारात्मक भूमिका सरकारने घ्यावी.
आदिवासी क्षेत्रामध्ये मुख्यत्वे भाताची लागवड असते. आदिवासी बांधवांना या कालावधीत उपजिवीकेचे साधन नसल्याने महाविकास आघाडीच्या शासनाने खावटीचे अनुदान दिले होते. त्याच धर्तीवर यावर्षीही खावटीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन दिले आहे.